चिंचपेटी हा खास मराठमोळा दागिना आहे. १६ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून तो प्रचलित असावा. अनेक जुन्या काव्यातूनही चिंचपेटीचा उल्लेख आढळतो. चिंचेच्या पानाचा आकार असलेल्या सोन्याच्या पेट्यांवर मोत्याचे किंवा हिऱ्याचे कोंदण करुन व त्या पेट्या रेशमाने पटवून केलेला, वज्रटीकेसारखा गळ्यालगत बसणारा अलंकार.
पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिरात पेशवाईत रुक्मिणीला दिलेल्या चार चिंचपेट्या पहायल्या मिळतात. त्यात मोत्याची, पाचुची, माणकाची आणि हिऱ्यांची असे चार प्रकार आहेत. पेशवाईत चिंचपेटी मानाने मिरवत होती. पेशव्यांच्या घरातील स्त्रियांच्या गळ्यात चिंचपेटी असणारच. पेशवाईत सौ. पार्वतीबाईंनी लिहिलेल्या पत्रात जे दागिने करायला सांगितले आहेत, त्यात चिंचपेटीचा आवर्जून समावेश आहे.
भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान संपादन करणाऱ्या, महाराष्ट्राची सुकन्या, डॉ. आनंदीबाई जोशी ह्यांच्या गळ्यातही चिंचपेटी रुळताना दिसते आहे.
हा फोटो आहे काशीबाई कानिटकरांचा. काशीबाई कानिटकर म्हणजे मराठीतल्या पहिल्या स्त्री-कादंबरीकार. त्यांची रंगराव ही कादंबरी १९०३ मध्ये प्रसिद्ध झाली. स्वतंत्र आणि आधुनिक विचार करणारी तेजस्वी स्त्री अशी काशीबाईंची ओळख आहे. त्यांच्या गळ्यातील ही चिंचपेटी त्यांच्या बाणेदार व्यक्तिमत्त्वाला अधिकच खुलून दिसते आहे.