मंगळसूत्र – इतर कोणत्याही अलंकारापेक्षा अधिक महत्त्वाचा अलंकार म्हणजे मंगळसूत्र.हा महाराष्ट्र या प्रदेशातील सुवासिनींचा प्रमुख सौभ्याग्यालंकार. मंगळसूत्रासाठी काचेचे काळे मणी दोन पदरी दोऱ्यात ओवतात व मध्यभागी सोन्याचे चार गोलमणी व सोन्याच्या दोन लहान वाट्या बसवतात
सौभाग्याचे प्रतीक असल्याने मंगळसूत्र अहेव लेणं म्हणून ओळखले जाते. -
आहेव येवढं लेणं डाळी डोरल्यामधी पेटी |
लेते कंथाच्या राजवटी ।
डाळीच्या डोरल्यामधी काळी दुल्लड झोकं खाई|
भ्रतार म्हणीती ह्या ग डोरल्याचं नाव काई ।
मंगळसूत्राला गाठले असेही म्हटले जाते. दोन वाट्या, सोन्याचे चार मणी काळ्या मण्यांच्या भरगच्च पोतीत गाठलेले असते. जसे उत्तरेला सुवासिनीच्या हाती सौभाग्य चुड्याचे महत्त्व आहे तसेच महाराष्ट्रात चुड्यासमवेत मंगळसूत्राचे महत्त्व आहे.
नको मला बिंदी | नको तो चंद्रहार
पुरे एक अलंकार |
माझ्या मनींची हौस मी ग सांगते दम धरा |
राम अवतारी डोरलं वर जाळीचा मणी करा । -
ह्या ओवीत सांगितलेले मंगळसूत्र म्हणजे मुहूर्तमणी किंवा मणी – मंगळसूत्र, ज्यात काळ्या मण्यांच्या पोतीत मध्ये एक सोन्याचा मणी असतो.
ग्रामीण बोलीत मणीमंगळसूत्रालाच डोरलं म्हंटले जाते. डोरलं हे नाव डोरली या फळापासून आलं आहे. कारण मणीमंगळसूत्रामध्ये ज्या गोलाकार वाट्या वापरल्या जातात त्या अगदी हुबेहूब डोरलीच्या फळासारख्याच दिसतात. गोलाकार सुंदर नक्षीकाम केलेल्या सोन्याचा वाट्या आणि काळ्या मण्यांमध्ये ओवून डोरलं हा सौभाग्य अलंकार तयार होतो.
दाते(महाराष्ट्र शब्दकोश) शब्दकोशात डोरलं या शब्दाची व्युत्पत्ती ही डोरलीच्या फळासारखा सोन्याचा दागिना अशी दिलेली आहे. ज्या डोरलीच्या फळावरून डोरलं हा शब्द रूढ झाला ती डोरली वनस्पती अतिशय गुणकारी समजली जाते. डोरलीच्या लंबगोलाकार फळाला डोरलीवांगी म्हंटले जाते. काटेरी वनस्पती असल्याने याला काटेरिंगणी म्हणूनही संबोधले जाते. ही डोरली बहुगुणी आहे. अगदी वांग्याच्या रोपासारखेच हे झुडूप असते. याची फुले जांभळ्या रंगाची असतात. तर फळे पिवळी असतात. हाडांच्या विकारावर, उदरविकारावर, कफविकारांवर या औषधी वनस्पतीचा वापर केला जातो. याच्या बियांचा उपयोग स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारींमध्ये होतो.